पुण्यातील MPSC आंदोलन प्रकरणी दुसरा गुन्हा; शिवराज मोरेंसह ५ जणांची नावे, काय घडलं?

पुणे : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे MPSC आंदोलनाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आलं होतं. मात्र, ड्रोन उडवण्यासाठी किंवा चित्रीकरणासाठी पुणे पोलिसांची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
MPSC आंदोलनाप्रकरणी यापूर्वी १५ जणांवर गुन्हा
दरम्यान, पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी यापूर्वीच विश्रामबाग पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आंदोलनासाठी पोलिसांना पत्र दिल्यानंतर संबंधित आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मान्य झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचं पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात आलं होतं.
मात्र, सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. सरकारविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अशा आरोपांखाली १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांची नावे नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं.
रोहित पवार यांच्याशिवाय या १५ जणांची नावे
आंदोलनाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या गुन्ह्यात खालील १५ जणांची नावे आहेत.
प्रमोद पाटील
अक्षय कांबळे
अनिकेत देशमाने
प्रवीण महादेव पाटील
ऋषिकेश गांगुर्डे
प्रियंका चौधरी
नितीन गिते
सोमनाथ चव्हाण
ओंकार पाटील
गजानन शेळके
अजित काकडे
सिद्धार्थ पंचांगे
संकेत कणसे
सिद्धार्थ जांभूळकर
साहेबराव क्षीरसागर
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली. पुणे शहरात २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना, तसेच शास्त्री रोड आणि परिसरात आंदोलन, सभा, मोर्चे व रास्ता रोको करण्यावर निर्बंध असताना आंदोलन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९(२), १८९(३), १८९(५), १२६(२), २२३, २७० आणि २९२, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१), ३७(३), १३५, ११२ आणि ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भिंगारदिवे करत आहेत. आता विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्याने MPSC आंदोलनासंदर्भातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागलं आहे.
