मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे फरार, पोलीसांकडून शोध सुरू….
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दोन दिवसांपूर्वी पडला. यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला होता. हा पुतळा उभारण्याची जबाबदारी जयदीप आपटे यांना दिली होती.
या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे येथील २५ वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे नॉट रिचेबल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून पसार झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा मोबाईल क्रमांकही आता बंद आहे. तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे. तो कारखाना देखील ताडपत्रीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे. जयदीप आपटे यांना शिल्पकलेचा केवळ अडीच वर्षाचा अनुभव असून, आतापर्यंत त्यांनी फक्त दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले आहेत, अशी माहिती त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान, दिली होती.
यामुळे एकडा कमी अनुभव असताना त्यांना शिवाजी महाराजांचा मालवण येथील भव्य पुतळा उभारायची जबाबदारी का दिली असा प्रश्न विरोधकाकडून सरकारला विचारला जात आहे.
दरम्यान, शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यासोबतच राज्यातील विविध जिल्ह्यात दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहेत.