वडिलांना वाचवायला धावले… क्षणात संपूर्ण संसार उद्ध्वस्त; खामगावच्या शिंदे कुटुंबाच्या अंताने सातारा सुन्न


फलटण : सातारा जिल्ह्यातील खामगाव गावात बुधवारी पहाटे घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. सकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील अंगणात उभे असताना सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (४५) हे अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. त्यांच्या आरडाओरडीनंतर पत्नी गंगुबाई (४०), मुलगा सचिन (२६) आणि मुलगी आरती (२४) मदतीसाठी धावत आले. मात्र, एकमेकांना धरून वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही विद्युत प्रवाहाच्या विळख्यात अडकले आणि काही क्षणांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खामगावातील खासगी शाळेजवळ वास्तव्यास असलेले शिंदे कुटुंब गावात कष्टाळू आणि मनमिळावू म्हणून ओळखले जात होते. पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. फलटण ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

घरासमोरील विद्युत तारेत प्रवाह कसा आला, मुसळधार पावसामुळे कुठे गळती झाली होती का, अथवा अन्य तांत्रिक बिघाड कारणीभूत होता का, याचा सखोल तपास सुरू आहे. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी धावलेल्या कुटुंबाचा अवघ्या काही क्षणांत झालेला अंत खामगावसह संपूर्ण तालुक्याला हादरवून गेला असून गावात शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!