मुलाच्या जिद्दीला सलाम! सकाळी शाळा अन् दुपारी मंदिराबाहेर व्यवसाय, बापासाठी व्यवसायाची धुरा घेतली खांद्यावर….
बीड : इच्छा तिथे मार्ग असला की कोणीही काहीही करू शकतो याचे एक उदाहरण समोर आले आहे. चिकाटी अन जिद्द असली की काहीही शक्य आहे असेच एक उदाहरण बीडच्या परळी वैजनाथ येथे पाहायला मिळाले आहे.
सकाळी ८ ते दुपारी १ शाळा करायची आणि शाळा संपली की दुपारी आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायची इतकच नाही तर या व्यवसायात मदत करताना शाळेतील दिलेला गृहपाठ ही पूर्ण करायचा.
परळी वैजनाथ येथील दिपक मुंडे नाव असलेल्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने सर्व सुविधा असताना देखील अभ्यास न करणाऱ्या पाल्यांना एक आदर्श उदाहरण दिलं आहे.
दिपकचे वडील वैद्यनाथ मंदिरासमोर बेलफुल विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायात दिपक त्यांना मदत करतो. विशेष म्हणजे मंदिरासमोर असलेल्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते.
असे असतानाही या ठिकाणी अभ्यास करताना त्याचं लक्ष किंचितही विचलित होत नाही. त्याचा अभ्यास सुरुच असतो. अभ्यास झाल्यानंतर तो खेळायलाही जातो. पण परिस्थितीशी न घाबरता लढतोय. या मुलाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.