शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्री, कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिर्डी : शिर्डीत दररोज हजारो भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तर अनेक जण शिर्डीत पेड दर्शन घेतात. मात्र या दर्शन पासमध्ये फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आता पुन्हा अशाच प्रकारे सशुल्क दर्शन पास देण्याच्या नावाने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले करण्यात आले होते.
यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे; त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असताना देखील बनावट पास तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिर्डी साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. प्रकाशाने विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनावट दर्शन पास बनवले. साई संस्थानच्या चार नंबर प्रवेशद्वारावर संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय येताच आरोपी कर्मचाऱ्याने पास फाडल्याने त्याचं बिंग फुटलं.

साई संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून मुंबईच्या बेटर कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचा कंत्राटी डीटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पास विक्रीचा गोरख धंदा अनेक दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.