ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का! सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती; फडणवीसांकडून ‘अहिर’ शब्दाचा अर्थ, शिंदेंनी केली सचिन तेंडुलकरशी तुलना


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक धक्का देत आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून ज. मो. अभ्यंकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र, सभागृहाची परंपरा आणि सर्वानुमते निवड व्हावी या भूमिकेतून विरोधकांनी आपला प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर सचिन अहिर यांच्या नावावर एकमत झाले.

सत्ताधारी आघाडीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अहिर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. प्रस्तावाला सर्व पक्षांकडून अनुमोदन मिळाल्यानंतर सभागृहाने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करत “अहिर” शब्दाचा अर्थही स्पष्ट केला. “अहिर म्हणजे गोपालक आणि निर्भीड व्यक्ती. 1999 पासून मी त्यांना ओळखतो. चळवळीतून घडलेला कार्यकर्ता, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा नेता आणि सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवण्याची क्षमता त्यांच्यात आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खास शैलीत सचिन अहिर यांचे स्वागत केले. त्यांनी त्यांची तुलना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी करत, “एक सचिन क्रिकेटमधून मोठं नाव करून निवृत्त झाला, आता दुसरा सचिन नव्या इनिंगसाठी मैदानात उतरला आहे,” असे म्हणत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शेरोशायरी सादर करत सभागृहातील वातावरण हलकंफुलकं केलं.

दरम्यान, ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते असलेले सचिन अहिर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची थेट उपसभापतीपदी झालेली निवड राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. विरोधकांनीही प्रस्ताव मागे घेतल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असून, याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!