रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ! सरकारमधील बड्या मंत्र्यावर ५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, फडणवीस राजीनामा घेणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अनेक मंत्र्यावर थेट आरोप करत आहेत. असे असताना आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक मोठा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स नेमावी किंवा निवृत न्यायाधिशांच्या मार्फत चौकशी करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले, संजय शिरसाठ यांनी 5 हजार कोटी रुपयांची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली. 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केली.
मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमीपुत्रांशी गद्दारी केली आहे. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
यामुळे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय शिरसाट यांनी ते अध्यक्ष असताना हा निर्णय घेतला आहे. हा सरळसरळ भ्रष्टाचार केला आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. झुडपी जंगल जमीन पुन्हा माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बिवलकर कुटुंबाची देखील जमीन येत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
ती जमीन तत्काळ माघारी घ्यायला हवी. 20 तारखेला सिडकोवर भव्य मोर्चा घेऊन मी जाणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्चा होईल. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा. काँग्रेस देखील आंदोलनात सोबत असणार आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. याबदल्यात शिरसाट यांनी आर्थिक व्यवहार केला आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे.