Ring Road : सप्टेंबरपर्यंत रिंगरोडचे संमती निवाडे पूर्ण होणार, जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश…

Ring Road : रिंगरोडसाठीच्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पूर्वेकडील रिंगरोडसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी देण्यासाठी संमती दिली आहे, अशा शेतकऱ्यांचे संमती निवाडे हे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. संमती निवाडे प्रक्रिया अचूक आणि पारदर्शकपणे राबविण्यास सांगितले आहे.
रिंगरोडसाठीची संपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रिंगरोडचा भूसंपादनाबाबत बैठक आयोजित केली होती. त्या वेळी भूसंपादन समन्वय कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे तसेच विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या पश्चिम रिंगरोडसाठीची भूसंपादन ९० टक्के झाले असले, तरी पूर्व भागातील जमिनीचे सप्टेंबरअखेरपर्यंत संमती निवाडे पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच संपादित जमिनाचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व भागातील आतापर्यंत ५० टक्के भूसंपादन झाले आहे. Ring Road
पूर्व भागातील काही गावांची मोजणी प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. त्यामध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गासाठी पूर्वीचा ३१ किलोमीटरचा मार्ग हा भारतीय राष्ट्रीय महामार्गाने (एनएचएआय) पूर्ण करण्याचे ठरले होते. मात्र, हा महामार्ग तूर्त ‘एनएचएआय’कडून बाजूला पडला आहे. त्यामुळे तो ३१ किलोमीटरचा मार्गही आता राज्य रस्ते विकास महामंडळ पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे म्हातोबीचा आळंदी, शिंदवणे आणि वळवती या गावातील रिंगरोडच्या आखणीत बदल झाला आहे. परिणामी, त्या ठिकाणच्या जागेची मोजणी पुन्हा करण्याची वेळ आली आहे. त्याबाबत बैठकीत सूचना दिल्या आहेत.
पश्चिम भागातील संपादित ९० टक्क्यांपैकी काही प्रमाणात जमिनीचा सातबाऱ्यासह ताबा दिला आहे. उर्वरित जमिनीचा ताबा रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पश्चिम भागातील जमिनीवर सातबाऱ्यावर नाव लावण्याची कार्यवाही सुरू आहे.