जुन्या भांडणाचा राग अन् थेट गोळीबार; शिरूरमध्ये ३३ वर्षीय युवकाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा…


शिरूर : शिरूर शहरातील लाटे आळी येथील आंबेडकरनगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून ३३ वर्षीय युवकावर दबा धरून बसलेल्या दोघांनी गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.

हरीश उर्फ हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३३, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हरीश गंगावणे यांच्या डोक्याजवळ गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावर पोलिसांना दोन पुंगळ्या आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. तसेच लाटे आळी येथील चौकात बेग यांच्या घरासमोरही एक पुंगळी सापडली. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जुन्या भांडणातून वादाची ठिणगी

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात रोहित रवींद्र सोनवणे (वय २६, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीश गंगावणे यांचे सुमारे सहा महिन्यांपूर्वी रेव्हेन्यू कॉलनी येथील श्रद्धा हॉटेल अँड बारमध्ये भांडण झाले होते. यावेळी गंगावणे यांनी रोहित सोनवणे आणि अनिकेत गव्हाणे यांना मारहाण केली होती.

गुरुवारी रात्री लाटे आळी येथील चौकात दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी रोहित सोनवणे याने हरीश गंगावणे यांना अश्लील शिवी दिल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

दुचाकीवरून जात असताना पाठीमागून गोळीबार

रोहित हा हरीश गंगावणे यांच्या मित्राचा भाचा असल्याने शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास आंबेडकरनगर येथे गंगावणे त्याला भेटले. त्यावेळी रात्री झालेल्या भांडणाबाबत त्यांनी रोहितला सांगितले. त्यानंतर हरीश गंगावणे आणि त्यांचा मित्र जगताप हे दुचाकीवरून घरी निघाले.

यावेळी रोहित सोनवणे आणि अनिकेत गव्हाणे हे त्यांच्या पाठीमागे दबा धरून बसले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांकडे रिव्हॉल्व्हर होते. रोहितने पाठीमागून येत दुचाकीवर बसलेल्या हरीश गंगावणे यांच्या डोक्यावर जवळून गोळी झाडली. गोळी लागल्याने गंगावणे दुचाकीवरून खाली कोसळले.

त्यानंतर रोहित आणि अनिकेत घटनास्थळावरून पळून गेले. पुढे त्यांचा साथीदार आदित्य पवार स्कूटी घेऊन थांबला होता. त्या स्कूटीवरून तिघे पळून जात असताना लाटे आळी चौकातील बेग यांच्या घरासमोर त्यांनी हवेत आणखी एक गोळीबार केला. आरडाओरड करत तिघेही तेथून पसार झाले.

आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलिसांनी दोन पुंगळ्या आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!