खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांना दिलासा! १४ पिकांच्या हमीभावात वाढ; सूर्यफूल आणि कापसाला मोठा फायदा

खरीप हंगाम तोंडावर असतानाच केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. २०२६-२७ हंगामासाठी १४ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत हमीभावात वाढ करण्यात आली असून यामुळे धान, कापूस, तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे उत्पादकांना आर्थिक आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे सूर्यफूल पिकाच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आल्याने तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, बाजारातील चढ-उतार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची गरज लक्षात घेऊन हमीभाव वाढवण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या नव्या घोषणेनुसार धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे धानाचा नवीन हमीभाव २ हजार ४४१ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. दुसरीकडे कापूस उत्पादकांसाठीही आनंदाची बातमी असून कापसाच्या दरात प्रतिक्विंटल ५५७ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.

यंदाच्या निर्णयात सूर्यफूल पिकाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सूर्यफुलाच्या हमीभावात प्रतिक्विंटल ६२२ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर तूर, उडीद, बाजरी, मका आणि सोयाबीनच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार काही पिकांवर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांसाठी सुमारे २ लाख ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात ८२४.४१ लाख मेट्रिक टन पिकांची खरेदी करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. हमीभाव वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि शेती क्षेत्राला आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.