निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!! देशातील या राजकीय पक्षांची मान्यता होणार रद्द, अनेकांना मोठा धक्का…

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या (RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकाही निवडणुकीत सहभागी न झालेल्या आणि प्रत्यक्षात कार्यालय नसलेल्या पक्षांवर ही कारवाई करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे ३४५ पक्ष वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे की, सध्या नोंदणीकृत २८०० हून अधिक मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत राहण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करत नाहीत. अशा पक्षांवर मोहीम राबवून कारवाई केली जात आहे.
हे असे पक्ष आहेत, त्यांनी २०१९ पासून कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत भाग घेतलेला नाही आणि ज्यांची कार्यालये देशात कुठेही प्रत्यक्ष आढळलेली नाहीत. देशभरात सध्या सुमारे २८०० RUPPS अस्तित्वात आहेत. मात्र यापैकी बऱ्याच पक्षांनी नोंदणी करताना आवश्यक त्या अटींचे पालन केलेले नाही. यावरून आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना संबंधित पक्षांना “कारणे दाखवा’ पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील टप्प्यात सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत या पक्षांची नोंदणी झाली असली तरी, करसवलती आणि इतर सवलतींचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे ही कारवाई म्हणजे राजकीय व्यवस्थेतील अनागोंदी थांबवण्यासाठीचा एक प्रयत्न असल्याचे आयोगाचे मत आहे.