RBIचा ‘स्ट्राईक’! इंडसइंड बँकेला 59 लाखांचा दंड; नियम मोडणाऱ्या 4 वित्तीय संस्थांवर कारवाईचा बडगा

पुणे : देशातील बँका आणि वित्तीय संस्थांवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यावेळी खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेला तब्बल 59.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्याचबरोबर तीन वित्तीय कंपन्यांवरही आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रातील नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
RBIच्या तपासणीत इंडसइंड बँकेकडून ठेवीवरील व्याजदर आणि सिक्युरिटायझेशनसंबंधी काही महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. तपासादरम्यान बँकेने काही चालू खात्यांवरील ठेवींवर व्याज दिल्याचे समोर आले. तसेच बँकेने ‘सिंथेटिक सिक्युरिटायझेशन’ स्वरूपातील व्यवहार केल्याचेही निदर्शनास आले, जे RBIच्या मार्गदर्शक सूचनांशी विसंगत असल्याचे मानले गेले. यानंतर केंद्रीय बँकेने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला.

इंडसइंड बँकेव्यतिरिक्त फ्यूजन फायनान्स, नॉर्दर्न आर्क कॅपिटल आणि मुथूट एमक्रेड या वित्तीय संस्थांनाही दंडाचा फटका बसला आहे. फ्यूजन फायनान्सवर केवायसी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. नॉर्दर्न आर्क कॅपिटलवर ग्राहक तक्रार निवारण आणि अंतर्गत लोकपाल व्यवस्थेबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तर मुथूट एमक्रेडने काही कर्जखाती नियमबाह्य पद्धतीने ‘स्टँडर्ड’ श्रेणीत वर्गीकृत केल्याचे आढळल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.


महत्त्वाची बाब म्हणजे या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांच्या ठेवी, खाते व्यवहार किंवा सेवांवर कोणताही थेट परिणाम होणार नाही. RBIने स्पष्ट केले आहे की ही कारवाई केवळ नियामक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली असून, ग्राहकांच्या हिताचे संरक्षण हेच यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
गेल्या काही महिन्यांत RBIने बँका आणि वित्तीय संस्थांवरील देखरेख अधिक कडक केली आहे. नियमांचे उल्लंघन, ग्राहक सेवा, केवायसी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील इतर संस्थांनाही हा मोठा इशारा मानला जात आहे.