Raj Thackeray : मनसे-भाजप युती कुठं फिस्कटली? राज ठाकरे यांनी का नाकारला प्रस्ताव? माहिती आली समोर..

Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.

तसेच राज्यात ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सध्या बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. आधी शिंदेंची शिवसेना, मग अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेणाऱ्या भाजपने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याची तयारी सुरू केली आहे.
मनसेला एक ते दोन जागा सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी त्यांचे पुढील सर्व दौरे रद्द केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. Raj Thackeray
महायुतीत या, लोकसभा निवडणूक महायुतीत येऊन लढा. एक ते दोन जागा तुमच्यासाठी सोडतो, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आला. पण यात एक मेख आहे. मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील, असा भाजपचा प्रस्ताव होता. तो राज ठाकरेंनी फेटाळून लावला. माझे उमेदवार माझ्याच पक्षाच्या चिन्हावर लढतील असं राज यांनी भाजपला सांगितले आहे.
दरम्यान, मनसेचे उमेदवार भाजप चिन्हावर निवडणूक लढण्यास राज यांचा विरोध आहे. तो प्रस्ताव त्यांना मान्य नाही. त्यामुळे भाजपनं राज यांना आणखी एक प्रस्ताव देण्यात आला. तुम्ही आता महायुतीत या. विधानसभेला तुमचा योग्य तो सन्मान राखण्यात येईल. तुमची ताकद लक्षात घेऊन जागा देण्यात येतील. लोकसभेला होणाऱ्या मदतीच्या बदल्यात राज्यसभेची जागा देण्यात येतील, असा प्रस्ताव भाजपनं मनसेला दिला आहे.
