राज ठाकरे २२ तारखेला शिवाजी पार्कवर काय दाखवणार…?
मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्यातील मतदारांना काही व्हॅल्यू आहे, असं वाटत नाही. आज याच्याशी झिम्मा, त्याच्याशी फुगडी हेच चाललंय. यावर मला ट्रेलर, टीझर टाकायचा नाही. थेट पिक्चर २२ तारखेला शिवाजी पार्कवर दाखवणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो . त्यानिमित्त पनवेल येथे राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले , मी चेहरे वाचतो, कोण बरोबर राहणार आहे कोण जाणार आहे हे आधीच कळतं. मी झेपेल तेवढेच वाचतो, असा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
हल्ली आपल्याकडे कुणीही इतिहासावर बोलायला लागले आहे. जयंत्या, पुण्यतिथी करायची आणि जुन्या गोष्टी उकरुन वाद करायचे. आपल्याकडे स्मारक म्हणजे पुतळे आहे. वर्षभर कुणीही ढुंकूनही बघत नाही. महाराजांचे गडकिल्ले हे महाराजांचे स्मारक आहे. माझी इच्छा होती की जर इंदूमिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक बांधायचे होते तर त्याठिकाणी जगातील भव्य लायब्ररी व्हायला हवी होती, अशी सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. तसेच मी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अणावरणासाठी गेलो होतो, मला कळतच नव्हत कोण कुठला आमदार आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली आहे.