राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर! CM फडणवीसांसोबत बंद दाराआड बैठक; मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सकाळीच राज ठाकरे यांचा ताफा ‘वर्षा’वर पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीमागील नेमका विषय काय, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची यापूर्वीही भेट झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समोर आले होते.


दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करत मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे.
भेटीमागे नेमकं कारण काय?
राज ठाकरे यांनी आज सकाळी सुमारे 8.20 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट अचानक झालेली नसून पूर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
या भेटीत अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीमुळे चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या पुनर्रचनेचा मुद्दा, क्रीडा सुविधा, मुंबईतील क्रिकेटसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.