मुंबईत पावसाने केला राडा!! तोडले सर्व रेकॉर्ड, जनजीवन विस्कळीत….

मुंबई : गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. मुंबईसह पुणे आणि सोलापूरमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली.

सोमवारी (ता. २६ मे) झालेल्या पावसाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हवामान विभागाने सांगितले की, तळ कोकणात आलेल्या मान्सूनने अगदी २४ तासांहून कमी वेळात अत्यंत वायुवेगने मुंबईत धडकला असल्याचे जाहीर केले. त्यामळे १६ दिवसा आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने एक विक्रम केला आहे.
तसेच मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, मुंबईत याआधी मान्सून लवकर येण्याचा मागील विक्रम हा २९ मे होता. १९५६, ६२ आणि १९७१ या वर्षात नोंदवला गेला होता.

दरम्यान, मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात रविवारी (२५ मे) ते सोमवारी (२६ मे) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल २५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण २९४ मिमी पाऊस पडला आहे. तेच १०७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९१८ साली मे महिन्यात २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, मुंबईत सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत १३५ मिमी पावसाची नोंद झाली होती.
सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख ११ जून होती. पण तब्बल १६ दिवस आधीच मुंबईत दाखल झाला. पण यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत झाली. मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल तसेच एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला.
मुंबईतील मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वे उशिराने धावत असल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-३ ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला आहे.