परतीच्या मान्सूनने दिला दिलासा, पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात सकाळपासून पाऊसाची दमदार एन्ट्री..

पुणे : राज्याकडे पावसाने मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली आहे. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात आज सकाळ पासून पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील पावसासंदर्भात पुणे हवामान खात्याकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे.
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडरा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आजपासून पुणे आणि मुंबईमध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमधील खोपोलीमध्ये शुक्रवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
तसेच रत्नागिरीमध्येदेखील पावसाला सुरुवात झाली आहे. महिनाभर पाऊस गायब झाल्याने शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली होती. परंतु पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हवामान खात्याकडून सप्टेंबर महिन्यामध्ये ९१ ते १०९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाने पुन्हा हजेरी लावली तर शेतकऱ्यांवरचे संकट टळू शकते. जर या महिन्यात चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येईल.