सावधान! राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील ५ दिवस राज्यभर पावसाचा कहर; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. तसेच आता पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबईत अंधेरी, सांताक्रूझ, विक्रोळी, घाटकोपर, वरळी, सायन आणि दादर परिसरात २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून अनेक भागांत पाणी साचले आहे. विक्रोळीतील वर्षा नगर येथे भूस्खलनाची घटना घडली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

दरम्या, कोकण विभागातील ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण कोकण पट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा व पुणे घाटमाथा, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १५ ते २० ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक वाढेल.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.