प्रेयसीचा खासगी व्हिडिओ व्हायरल होताच राहुल गायब! एक्स्प्रेस वेवर आयफोन अन् चपला ठेवून रचला अपघाताचा बनाव; ४५ दिवसांनी राजस्थानमध्ये सापडला

नवी मुंबई : प्रेयसीसोबतचे खासगी क्षण आक्षेपार्ह संकेतस्थळावर पोहोचले आणि त्यानंतर अचानक तरुण बेपत्ता झाला! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कडेला दुचाकी, चपला, बॅग आणि आयफोन सोडून गायब झालेल्या नागपूरच्या सॉफ्टवेअर अभियंत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४५ दिवस मोहीम राबवली. अपघात, आत्महत्या की अपहरण, अशा अनेक शक्यता तपासल्या जात असताना अखेर राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये तो काम करत असल्याचे उघड झाले. राहुल मिश्रा याच्या बेपत्ता होण्यामागील कारण समोर आल्यानंतर या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.
खासगी व्हिडिओ प्रकरणानंतर वाढल्या अडचणी

पोलिसांच्या माहितीनुसार, २३ वर्षीय राहुल मिश्रा हा नागपूरचा रहिवासी असून सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. माहिती तंत्रज्ञान प्रकल्पावर काम करताना त्याची तेलंगणातील आदिलाबाद येथील तरुणीशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळातील त्यांचे काही खासगी क्षणांचे व्हिडिओ आक्षेपार्ह संकेतस्थळावर प्रसारित झाले. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून वाचण्यासाठी राहुलने बेपत्ता होण्याचे नाटक केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

एक्स्प्रेस वेवर संशयास्पद वस्तू, दरीत हेल्मेट

७ ऑक्टोबर २०२६ रोजी खोपोली पोलिसांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या परिसरात राहुलची दुचाकी सोडून दिल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी एक बॅग, चपला आणि आयफोनही आढळला. पुढील तपासात हा आयफोन बनावट असल्याचे स्पष्ट झाले. रस्त्यापासून सुमारे दहा फूट खाली दरीत हेल्मेट सापडल्याने राहुलचा अपघात झाला असावा किंवा त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त झाली. कुटुंबीयांनी घातपाताची शंकाही उपस्थित केली. त्यामुळे पोलिसांनी अपहरण, अपघात आणि हत्येच्या शक्यतांचा विचार करून तपास सुरू ठेवला.
६०० फूट खोल दरीत शोध, चार पथके तैनात
राहुलचा शोध घेण्यासाठी घाट परिसरात चार दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली. ड्रोनच्या सहाय्याने परिसराची पाहणी करण्यात आली, तर चार बचाव पथकांनी दरीत उतरून शोध घेतला. सुमारे ५०० ते ६०० फूट खोलवर तपास करूनही राहुलचा कोणताही मागमूस मिळाला नाही. प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने मुख्यमंत्री कार्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातूनही पोलिसांकडे वारंवार चौकशी करण्यात येत होती.
११० जणांची चौकशी अन् राजस्थानमध्ये धक्कादायक शोध
तांत्रिक तपास आणि सुमारे ११० जणांकडे केलेल्या चौकशीनंतर राहुल राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तेथील एका हॉटेलमध्ये काम करताना आढळला. २३ नोव्हेंबर रोजी तो अकोला येथे परतला आणि त्यानंतर नागपूरमधील घरी पोहोचला, अशी माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली. तब्बल ४५ दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर राहुल सापडल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. मात्र, खासगी व्हिडिओ प्रकरण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
