“नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम!” शरद पवारांचा मोठा निर्णय; रोहित पवारांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू आणि आमदार रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत स्पष्ट संदेश दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून जवळपास सहा वर्षांनंतर त्यांच्याकडे संस्थेतील महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही बैठकींना त्यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली होती. मात्र या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

रोहित पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार. मागील सहा वर्षे सदस्य म्हणून केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे मी मानतो.”

रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न राहील. शिक्षण क्षेत्रात अधिक चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी केवळ त्यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली. निवडीनंतर बोलताना शरद पवार यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत महत्त्वाचे संकेत दिले.

रयत शिक्षण संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चांना नव्या राजकीय वळण मिळाले असून रोहित पवार यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिले जात असल्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!