पुरंदर विमानतळ जुन्या जागेवरच ! लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार -मुरलीधर मोहोळ
पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मंजुरीचे काम पूर्ण झाले आहे. मुळ जागेवरच हे विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतुक संचालनालयाकडे (डीजीसीए) मान्यता दिली आहे.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या वार्तालापात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ पत्रकारांशी संवाद साधत होते.यावेळी त्यांनी पुरंदरच्या प्रस्थावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न स्पष्ट केला आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा निश्चित केली आहे. या विमानतळाच्या जागेला महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमडीसी) यांनी मंजुरी दिली आहे. तसेच या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतुक संचालनलायानी मान्यता दिली आहे.
युती सरकारने त्यासाठी पुरंदर तालुक्यातील १ -अ नुसार जागा निश्चिती केली होती. या जागेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या जागेऐवजी ५-अ नुसार नवीन जागेचा प्रस्ताव दिला. त्यामुळे या जागेवरचा निर्णय होऊ शकला नाही. परंतु २०२३ साली सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या कामाला गती दिली आहे. त्यानुसार विमानतळाचा कामाला गती देऊन भूसंपादन करण्यात येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे