पुणेकरांनो, काळजी घ्या! पाऊस तर नाहीच, पण वाढता उकाडा ठरणार डोकेदुखी; हवामान विभागाचा इशारा


पुणे : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांची निराशा आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. शहरात पावसाचा अद्याप पत्ता नसतानाच आता उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवारी पुण्यात कमाल तापमान ३६.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे सरासरीपेक्षा तब्बल ५.७ अंशांनी अधिक आहे. तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर उष्णतेचे चटके जाणवत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

यंदा मे महिन्यातही पुण्यात अपेक्षित वळवाचा पाऊस झाला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सून सक्रिय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र महिन्याचे जवळपास तीन आठवडे उलटूनही शहरात पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा आणखी लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यातील परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. गेल्या १९ दिवसांत जिल्ह्यात केवळ १३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत सुमारे ८३ टक्के पावसाची तूट आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि शेतीच्या कामांवर होताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. संध्याकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते, मात्र पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!