पुणे हादरलं! मोशीमध्ये मोठी दुर्घटना, दोन मजली इमारत कोसळली, 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवड : मोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपोच्या जवळ असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली सुमारे 10 ते 14 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळली तेव्हा काही नागरिक आतमध्ये उपस्थित होते. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, बांधकाम अधिकृत होते की अनधिकृत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून बचावकार्य सुरू आहे.