पुणे हादरले! सदाशिव पेठेत मोठा राडा, किरकोळ वादातून तरूणावर कोयत्याने हल्ला, घटनेने खळबळ..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादाक घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने राडा करून एका २६ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दुसऱ्या तरुणावरही वार करण्यात आले. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वाघ (वय २६, रा. आंबेगाव पठार) असे टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.
अक्षय नऱ्हे येथील क्वालिटी कंपनीत मशिन ऑपरेटर म्हणून काम करतो. रविवारी (नऊ मार्च) रात्री नऊ वाजता तो मित्रासोबत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी चिमण्या गणपती चौक येथे गेला होता. सामना संपल्यानंतर रात्री साडेदहा वाजता तो घरी जात असताना दोन जणांसोबत किरकोळ वाद झाला. त्यांनी अक्षयला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षयच्या एका मित्राने भांडण सोडवले.
त्यानंतर अक्षय आणि त्याचे मित्र सदाशिव पेठ परिसरातील जयदीप फर्निचर दुकानासमोरील कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. पावणेअकराच्या सुमारास आधी भांडण झालेले दोघे आणि अन्य १२ ते १३ जण तेथे आले. त्यांनी अक्षयवर हल्ला चढवला. टोळक्याने अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने अक्षयच्या डोक्यावर, पाठीमागे आणि पाठीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
दरम्यान,अक्षयचा मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता, हल्लेखोरांनी त्याच्याही हातावर कोयत्याचे वार केले. हल्लेखोरांनी परिसरात दहशत माजवून आरडाओरड केली आणि कोयते हवेत फिरवून पलायन केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. अक्षय वाघला त्याच्या मित्राने तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.