फलटणमध्ये युवा डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ; चिठ्ठीत माजी मंत्र्यांच्या OSDवर आरोप, आरोग्यमंत्री म्हणाले…

पुणे : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले २७ वर्षीय युवा डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यात खळबळ उडाली आहे. वरिष्ठांकडून त्रास आणि दबाव असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीचेही नाव समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी रुग्णालयातील काही डॉक्टरांकडून त्रास होत असल्याची तक्रार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

‘कायद्यापुढे सगळे समान’
डॉ. रुपनवर आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी यांच्यात वाद झाल्याचा आणि दबाव टाकण्यात आल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात असल्याबाबत आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर आबिटकर यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीविरोधात तक्रार असल्यास कायदेशीर मार्गाने ती नोंदवता येते. डॉ. रुपनवर यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती. पोलीस तपासातून संबंधित प्रकरणातील योग्य-अयोग्य बाबी स्पष्ट होतील.


कायदा सर्वांपेक्षा मोठा असून कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. त्यामुळे कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत काय कारवाई झाली?
या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बनले डॉक्टर
दरम्यान, डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली आहे. त्यांचे मूळ गाव फडतरी असून, ते अवघ्या एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर मांडवे येथील त्यांचे मामा दयाराम पाटील आणि नानासाहेब पाटील यांनी त्यांचा सांभाळ केला.
मामांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे राजेंद्र यांना वाढवले आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजेंद्र यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. मांडवे येथील माध्यमिक शाळेतून दहावीमध्ये त्यांनी ९४ टक्के गुण मिळवले. त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधून बारावी विज्ञान शाखेत ९२ टक्के गुण मिळवत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
राजेंद्र हे दोन भावंडांपैकी एक होते. त्यांचे मोठे बंधू सागर हे आयसीआयसीआय बँकेत कार्यरत आहेत. त्यांच्या मामांनी राजेंद्र यांच्या नावावर दोन एकर जमीनही करून दिली होती.
दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांच्या मामांसह कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे. आता पोलीस तपास आणि आरोग्य विभागाच्या चौकशीतून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.