पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका ; मेट्रो लाईन 3 आता लवकरच….

पुणे : पुणे शहरातील वाहतुकीची समस्या हा मोठा गंभीर विषय आहे. पुण्यातील रस्ते आणि वाहनांची संख्या यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता लवकरच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुणेकरांना लवकरच माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा प्रवास मेट्रोच्या माध्यमातून करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ ची दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला २३.३ किलोमीटर लांबीच्या पूर्णपणे उन्नत मार्गावर आणि मान डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता मेट्रो लाईन 3 ची दुसरी चाचणी ही यशस्वी झाली आहे.
मेट्रो लाईन 3 ची दुसरी चाचणी मान डेपो ते हिंजवडी फेज २ दरम्यान सुमारे ४० किमी प्रतितास वेगाने पार पडली आहे. या प्रकल्पाचे जवळपास ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही दुसरी चाचणी आगामी मेट्रो लाईनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि क्षमता दर्शवत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनची एकूण लांबी २३.३ किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे पुणेकरांना आता वाहतुकीतून सुटकेचा श्वास घेता येणार आहे.
