पुणेकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताना लक्ष द्या! ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते राहणार बंद..


पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असताना पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भवानी माता, तांबडी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

भवानी माता मंदिर परिसरात वाहतुकीत बदल

भवानी माता मंदिर परिसरातील महात्मा फुले रस्त्यावर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रामोशी गेट चौक ते जुना मोटर स्टँडदरम्यानचा महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गावर पार्किंगलाही बंदी असेल. वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा आणि पदमजी चौकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बदलांचा परिणाम पीएमपी बससेवेवरही होणार आहे. रामोशी गेटमार्गे जाणाऱ्या पीएमपी बस आता ढोले चौक (सेव्हन लव्हज चौक), गोळीबार मैदान चौक आणि खाणेमारुती चौक या मार्गाने धावतील.

तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश बंद

तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरातही वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणपती चौक ते मंदिरादरम्यान तसेच सकाळ प्रेसकडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौक, बाजीराव रस्ता आणि शनिवारवाडा मार्गाचा पर्याय वापरावा. तसेच तांबडी जोगेश्वरी, अष्टभुजा देवी आणि अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर परिसरातील पार्किंग बंद राहणार आहे.

भाविकांच्या वाहनांसाठी टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, मंडईतील पार्किंग तळ आणि परिसरातील अधिकृत पार्किंग झोन उपलब्ध असतील.

चतुःशृंगी मंदिर परिसरातही वाहतुकीचे नियोजन

चतुःशृंगी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढणाऱ्या वेळेनुसार सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात येईल किंवा वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात येतील.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना निर्बंध लागू असलेल्या मार्गांवर जाणे टाळण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रोत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांची गैरसोय कमी करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!