पुणेकरांनो, छत्रीला द्यावी लागणार विश्रांती! पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी; हवामान विभागाचा मोठा अंदाज

पुणे : जुलै महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पुणेकर पुन्हा एकदा पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी महत्त्वाचा अंदाज जारी केला आहे. पुढील ३ ते ४ दिवस पुण्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर गेल्या चार दिवसांपासून शहरात पावसाने दडी मारली आहे. रविवारी सकाळपासून पुणे शहर आणि उपनगर परिसरात कडक ऊन जाणवत होते. त्यानंतर दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

पाऊस थांबल्याने पुण्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी (ता. १३) पुणे आणि परिसरातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

दरम्यान, पावसामुळे मिळालेला दिलासा काही दिवसांचा ठरणार असून, आता पुणेकरांना पुन्हा मान्सूनच्या जोरदार पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.