पुणेकरांनो, विकेंडचा प्लॅन करण्याआधी थांबा! हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील ४ दिवस असे असेल वातावरण

पुणे : विकेंडला बाहेर फिरण्याचा किंवा प्रवासाचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, पुढील ३ ते ४ दिवस पुण्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार आहे. मुसळधार पावसाची शक्यता नसली तरी अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून, गुरुवारी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, कोकणात पुढील ३ ते ४ दिवस अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी विकेंडचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.