पुणेकरांनो, बाहेरचं खात असाल तर सावध! ‘या’ बाबतीत पुणे राज्यात अव्वल; तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा

पुणे : बाहेरचे खाद्यपदार्थ आवडीने खाणाऱ्या पुणेकरांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणे शहरातूनच प्राप्त झाल्या असल्याचा खुलासा अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

‘एमसीसीआयए’ आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांकडून अन्नातील भेसळ, अस्वच्छता आणि इतर तक्रारी नोंदवण्यासाठी एफडीएने विशेष डिजिटल डॅशबोर्ड तयार केला आहे. या डॅशबोर्डवर राज्यभरातून तक्रारी येत असल्या, तरी सर्वाधिक तक्रारी पुण्यातून नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांतील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
केवळ एक्सपायरी डेट पाहून वस्तू खरेदी करू नका
मुंढे म्हणाले, बाजारातून कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना केवळ किंमत किंवा एक्सपायरी डेट पाहणे पुरेसे नाही. त्या उत्पादनात कोणते अन्नघटक वापरण्यात आले आहेत, याचीही ग्राहकांनी खात्री करावी. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, त्यामागे अन्नाची गुणवत्ता हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

तक्रारींवर तातडीने कारवाई, अधिकाऱ्यांवरही नजर
एफडीएने तक्रार निवारणासाठी डिजिटल यंत्रणा उभारली असून, नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नाही, तर त्याची माहिती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबरोबरच निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचा इशारा मुंढे यांनी दिला.

AI आणि ब्लॉकचेनच्या मदतीने भेसळखोरांवर नजर
भेसळखोरांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी एफडीए आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एखाद्या हॉटेल किंवा अन्न उत्पादकाविरोधातील पूर्वीच्या कारवायांचा इतिहास AI प्रणालीद्वारे तपासला जाईल. तसेच एकाच मालकाच्या विविध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, उत्पादकापासून वितरकापर्यंत संपूर्ण साखळीवर देखरेख ठेवली जाणार आहे.