Pune News : एक भेट अन् लाखोंची फसवणूक! तिने ७४ वर्षीय व्यक्तीला भेटण्यास बोलावले, भेटीनंतर धक्काच बसला..

Pune News पुणे : सध्या सर्व काही ऑनलाइन झाले आहे. यामुळे एका मोबाईल ॲपमधून अनेक गोष्टी साध्य होतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. पुणे शहरात फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार घडत आहे. कधी ऑनालाइन टास्क देऊन फसवणूक केली जाते तर कधी ओटीपी घेऊन मोबाईल हॅक केला जात आहे.
फसवणुकीच्या या प्रकारात एका ज्येष्ठ व्यक्तीला वेगळाच अनुभव आला. एका ओळखीच्या महिलेने त्यांची दुसऱ्या महिलेशी ओळख करुन दिली. त्यानंतर ते एकमेकांना भेटले. फोन नंबर घेतले. पुढे मात्र त्या ७४ वर्षीय व्यक्तीची दोघांकडून फसवणूक सुरु झाली. अगदी ३० लाख रुपयांत ही फसवणूक झाली. Pune News
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र कोरडे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे येथील ७४ वर्षीय व्यक्तीची ओळख ज्योती बनसोडे हिच्याशी होती. ज्योती बनसोडे हिने मार्केट यार्डमध्ये राहणाऱ्या एका महिलेची ओळख त्यांच्याशी करुन दिली. जुलै महिन्यात ही ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे फोननंबर घेतले.
त्या भेटीच्या काही दिवसांनी ज्योती बनसोडे हिने त्यांना संपर्क केला. तिने सांगितले की, तुम्ही ज्या महिलेला भेटले तिला पोलिसांनी वेश्या व्यवसाय करताना पकडले आहे.
या प्रकरणात तुमचे नाव येणार आहे. तुमचा क्रमांक पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये मिळाला आहे. पोलीस तुमच्याविरुद्ध कारवाई करणार आहे. कारवाई थांबवण्यासाठी पैसे द्यावे लागतील
दरम्यान ७४ वर्षीय व्यक्तीने त्यांना पैसे दिले. परंतु त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी होत होती. थोडे दिवस गेले की ते सतत पैसे मागत होते. त्यांच्याकडून ज्योती बनसोडे आणि रामचंद्र कोरडे यांनी ३०.३ लाख रुपये घेतले.
त्यानंतर पैसे मागणे थांबले नाही. यामुळे अखेर त्यांनी मार्कट यार्ड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.