Pune News : पुण्यात २२ जानेवारीला मटण, चिकन विक्री राहणार बंद!! राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मटण व्यावसायिकांचा निर्णय…

Pune News : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

तसेच पुण्यात २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यवसाईक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी जाहीर केले आहे .
अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर २२ जानेवारी रोजी साजरा केला जात आहे. आपले सर्व मटण विक्री व्यवहार बंद करून या पवित्र कार्यक्रमात आनंद व उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली आहे. Pune News

दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोव्यापाठोठ महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती की, राज्य सरकारने येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. राज्य मंत्रिमंडळाने ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे.