Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण, संपूर्ण वातावरण भक्तिमय…

Pune News पुणे : देशासह राज्यभरात काल गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त वर्षभरापासून वाट पाहत होते. मुंबई, पुण्यात मोठे गणपती असतात. सार्वजनिक गणपती तसेच घरगुती गणपतीचे आगमन काल झाले आहे. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. Pune News

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती हा प्रसिद्ध आहे. येथे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात अथर्वशीर्ष पठण होत असते. ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसमोर ऋषिपंचमी निमित्त पहाटे महिलांनी अथर्वशीर्ष पठण करून आदिशक्तीच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव या वेळी उपस्थित होत्या. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते.

महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गजाननाला अभिवादन केले. मोबाईलचा प्रकाश उंचावून महिलांनी गणरायाचा जयघोष केला.
