Pune News : ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला, ज्येष्ठ महिलेची पोलीस ठाण्यात धाव, नेमकं घडलं काय?

Pune News : पणे शहरात विधानसभा निवडणूकांची धामधुम सुरू असतानाच आजींचे ३ बोकड अन् १ शेळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुण्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे.

आजींनी बोकड अन् शेळी न मिळाल्याने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली आहे. बोकड व शेळी चोरीची तक्रार देखील दिली आहे. आता पोलिसांनी घटनेच्या ७ दिवसानंतर या प्रकरणात बोकड व शेळी चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवत शोध सुरू केला आहे.
याप्रकरणी ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, हडपसर भागातील गोंधळेनगर परिसरात तक्रारदार राहायला आहेत. त्यांच्या घराजवळ कालवा आहे. घरासमोर मोकळी जागा असल्याने त्यांनी बोकड आणि शेळी पाळली आहे. त्यांनी कालव्यासमोरील मोकळ्या जागेत १२ नोव्हेंबर रोजी तीन बोकड आणि एक शेळी बांधून ठेवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी तीन बोकड आणि शेळी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बोकड आणि शेळीचा शोध घेतला. मात्र, बोकड आणि शेळी न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सात दिवसानंतर पोलिसांनी याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.