पुणे महापालिका आयुक्तांचा रस्ते बांधणीच्या डांबराबाबत मोठा निर्णय, ठेकेदारांना दे धक्का…

पुणे : पुणे महापालिकेत डांबरखरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता ठेकेदाराच्या ऐवजी स्वत:च थेट उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या आरोपांबाबत चौकशीही केली जात असून त्याचा अहवाल लवकरच सादर होईल, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत माहिती दिली. महापालिका थेट उत्पादकांकडून डांबर खरेदी करत असल्याने त्याची वाहतूकही महापालिकेलाच करावी लागत आहे. मात्र, अजून ही व्यवस्था नीट लागलेली नाही. उत्पादक कंपन्यांकडून पुरेसे डांबर मिळत नाही. यामुळे पालिकेला येरवडा येथे असलेला एकमेव हॉट मिक्स प्लांटही बंद ठेवावा लागत आहे.
याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नीलेश निकम यांनी केला होता. कागदपत्रे सादर करत चौकशीचीही मागणी त्यांनी डॉ. भोसले यांच्याकडे केली होती. यामुळे आता याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत.
याबाबत आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, आता ठेकेदारामार्फत डांबर खरेदीऐवजी थेट उत्पादक कंपन्यांकडूनच डांबर खरेदी केली जात आहे. तसेच निकम यांनी केलेल्या आरोपांबाबत पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर चौकशी करत आहेत. लवकरच ते चौकशीचा अहवाल सादर करतील, निविदाप्रक्रियेद्वारे एकाच ठेकेदाराला हे काम मिळत असल्याने यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही निकम यांनी केला होता.
ठेकेदारामार्फत डांबर खरेदीच्या निविदेची मुदत संपली आहे. आता पालिका थेट उत्पादकांकडून डांबराची खरेदी करत आहे. तीन महिन्यांसाठी १२ कोटी रुपयांचे डांबर खरेदी केले जाणार आहे. कंपनीकडून डांबराची थेट खरेदी केल्यानंतर वाहतुकीचा खर्च महापालिकेला करावा लागत आहे
महापालिकेला वर्षभर तीन हजार टन डांबर लागते. पूर्वी हे डांबर थेट उत्पादक कंपन्यांकडून मुंबईतून खरेदी केले जात होते. तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी ही प्रक्रिया बदलून डांबर खरेदी ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे महापालिकेचे प्रतिटन चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत आहे.