पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प; दरड कोसळल्याने 14 ट्रेन रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले; जाणून घ्या संपूर्ण माहिती


पुणे : पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या घाट विभागातील ठाकूरवाडी ते मंकी हिल दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. रुळांवरील माती आणि दगडांचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असले तरी दुरुस्ती पूर्ण झालेली नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव आज, 8 जुलै रोजीही पुणे-मुंबई रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मंगळवारी 14 महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून 13 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

या घटनेचा परिणाम केवळ पुणे-मुंबई मार्गावरच नाही, तर दक्षिण भारत, मराठवाडा, गुजरात आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे सेवांवर झाला आहे.

या प्रमुख गाड्या रद्द

पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय मुंबई-धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-सोलापूर, भुज-पुणे आणि सातारा-दादर एक्स्प्रेसची सेवाही रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस मुंबई ते खडकीदरम्यान रद्द करून खडकी स्थानकातून पुढे रवाना करण्यात आली. एकूण 8 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

प्रवाशांना 5.91 कोटींचा परतावा

रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवास रद्द करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून परतावा देण्यात आला आहे. मध्य रेल्वेने एका दिवसात 79,747 प्रवाशांना एकूण 5.91 कोटी रुपयांचा परतावा केला आहे. यामध्ये पुणे विभागातील 20,982 प्रवाशांच्या 1.56 कोटी रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे.

पुण्यातून मुंबईकडे 120 एसटी बस रवाना

दरम्यान, रस्ते वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि घाट रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मंगळवारी पुणे विभागातून मुंबईच्या दिशेने सुमारे 120 एसटी बस सोडण्यात आल्या. तसेच पुणे-नाशिक मार्गावरील बस वाहतूकही नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!