Pune Crime : धक्कादायक! लग्नाचे आमिष अन् वारंवार बलात्कार, एका विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय विवाहितेला उरुळी देवाची (ता. हवेली) येथील एका लॉजवर वारंवार नेवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दशरथ गायकवाड (पूर्ण नाव, वय, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २२ वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी २२ वर्षीय महिला या विवाहित आहेत. त्यांचे आणि त्यांच्या पतीचे वारंवार वाद होत होते. त्यामुळे फिर्यादी या पुण्यात अलिप्त राहत होती. दरम्यान, फिर्यादी या अलिप्त राहत असल्याचा फायदा घेत आरोपीने पीडिता यांना लग्नाचे आमिष दाखविले. Pune Crime

त्यानंतर आरोपी दशरथ गायकवाड याने पीडितेला उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरातील लॉजवर नेऊन वारंवार बलात्कार केला. फिर्यादी यांनी आरोपी दशरथ गायकवाड याच्याकडे लग्नाच्या बाबतीत विचारणा केली असता, आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.