Pune Crime : देवदर्शनाला नेण्याच्या बहाण्याने मांढरदेवी घाटात पत्नीचा खून, लोणीकंद पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या..

Pune Crime उरुळी कांचन : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

कौटुंबिक वादामुळे व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून पत्नीचा मांढरदेवी ते वाई घाटात खून करुन मृतदेह दरीत फेकून दिला. त्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तपास करुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक केली आहे.
ललिता अमोलसिंग जाधव (वय.३८ रा. फुलगाव ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग मुरली जाधव (वय.२६ रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगांव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण आव्हाळे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (ता.१४) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वयाने मोठी असल्याने तसेच घरच्यांच्या व नातेवाईक यांच्या दबावामुळे आरोपीने मयत ललिता हिच्यासोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. तसेच ललिता आरोपीला सोडचिठ्ठी देण्यास तयार नव्हती.
याच कारणावरून आरोपीने पत्नीला संपवण्याचा प्लान केला. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीने पत्नीला मांढरदेवी येथे दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून तिला मांढरदेवी येथे घेऊन गेला. दर्शनासाठी जात असताना आरोपीने घाटात कार थांबवून चालकाला मंदिराजवळील पार्कींगमध्ये कार लावून तिथेच थांबवण्यास सांगून ते दोघे घाटातून मंदिराच्या दिशेने पायी चालत गेले. Pune Crime
चालत जात असताना रस्त्यात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने पत्नी ललिता हिला उतारावरुन दरीत ढकलून दिले. मात्र, पत्नी २० फूट अंतरावर असलेल्या झाडाझुडपात अडकली. आरोपीने खाली उतरून झाडाझुडपात अडकलेल्या पत्नीचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह डोंगर उतारावरुन ढकलून दिला.
दरम्यान, आरोपीने लोणीकंद पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता महिलेचा तपास करत असताना आरोपीने तिचा खून करुन मृतदेह डोंगर उतारावरुन फेकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी अमोलसिंग जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे करीत आहेत.