Pune Crime : धक्कादायक! गाडी वेगाने नेल्याच्या कारणावरुन कोयत्याने वार करुन तरुणाचा निर्घुण खून, पुण्यातील घटनेने खळबळ…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ गाडी वेगाने नेली, या कारणावरुन तिघा अल्पवयीन मुलांनी तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अक्षय मारुती किरवले (वय २०, रा. गणेशनगर, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गणेशनगरमध्ये शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. Pune Crime
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा एका स्वीट मार्टमध्ये काम करत होता. ही अल्पवयीन मुले व अक्षय एकाच वस्तीत राहतात. वेगाने गाडी नेल्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अक्षय याच्या घरासमोर तिघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या अक्षय याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.