Pune Crime : तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात संतापजनक घटना..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे
एका तिसरीत शिकणाऱ्या मुलानं प्रीस्कूलमधील एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.
त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं असता मुलाला जामीन मिळाला आहे. कोर्टाने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.
आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी एकाच भागात राहातात. दोघंही एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांचं कुटुंबही एकमेकांना ओळखतं. पीडित मुलगी आरोपीला दादा म्हणते. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आरोपीच्या घराच्या परिसरात एकटी दिसली.
या संधीचा फायदा घेऊन आरोपी मुलाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईनं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. Pune Crime
यानंतर पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींनी मुलीला विश्वासात घेत, तिची चौकशी केली, यानंतर तिने सगळा घटनाक्रम सांगितला.
दरम्यान, इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या मुलानं अशाप्रकारे अत्याचार केल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी मुलाच्या कुटुंबासह पोलीस आणि एनजीओचे प्रतिनिधी सगळेच हैराण झाले. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी त्याचं वय पाहता मुलाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने तातडीने जामीन दिला आहे.
तसेच मुलाला पालकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरातून मुलानं हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.