Pune Accident : पुण्यात सिग्नल सुटला अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं, आई वडिलांच्या डोळ्यांसमोर जुळ्या मुलींनी सोडला जीव…


Pune Accident पुणे : विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला बाजूने जाणाऱ्या पेट्रोल टँकरचा धक्का बसल्याने दुचाकीवरील साडेतीन वर्षाच्या जुळ्या मुली चाकाखाली सापडून ठार झाल्या. मुलींच्या आईची प्रकृती गंभीर असून, मुलींचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत. Pune Accident

साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्ष) अशी मृत्यू पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. या अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या आहेत.

विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद रामलाल यादव (वय २७, उत्तर प्रदेश) या टँकरचालकाला ताब्यात घेतले आहे.

ही दुर्घटना सोमवारी (ता.१६) पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेत दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याने उपनगरातील जड वाहनांचा बेशिस्त आणि भरधाव वेगाने वाहने चालविण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, झा कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील आहे. सतीशकुमार पुण्यात नोकरी करत होते. सोमवारी ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते.

विश्रांतवाडी चौकातील सिग्नलला ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्दळीच्या वेळीच अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच, वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी काही वेळात वाहतूक सुरळीत केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!