विलास घुले हत्या प्रकरण पेटलं; खासदार पुत्राच्या अटकेसाठी केजमध्ये जनआक्रोश, राजकीय वर्तुळात खळबळ


केज : बीड जिल्ह्यातील केज येथील विलास घुले हत्या प्रकरण आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव चर्चेत आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनंतर खासदार पुत्राला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी केज शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून तपास यंत्रणेकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

विलास घुले हत्या प्रकरणाला दोन आठवडे पूर्ण झाले असून, अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव समोर आले आहे. घुले कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत सौरभ सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात एसआयटीकडून सौरभ सोनवणे यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे.

विलास घुले यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, या हत्येतील खऱ्या सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हल्ल्यावेळी आरोपी विलास घुले यांना मारहाण करत असताना सौरभ सोनवणे यांचे नाव घेत होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच पोलिसांनी तक्रारीत नाव असूनही अद्याप कठोर कारवाई केली नसल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर केज शहरात न्यायाच्या मागणीसाठी मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार पुत्राला तातडीने अटक करा, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चादरम्यान घुले कुटुंबीयांचे नातेवाईक रमेश घुले यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. खासदारांकडून त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, विलास घुले यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांकडून न्यायाचे आश्वासन मिळाल्यानंतर तब्बल ११ तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले होते आणि त्यानंतर विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते आणि विविध सामाजिक संघटनांकडूनही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. आता पोलिस तपासात पुढे काय निष्पन्न होते आणि या प्रकरणात कोणावर कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!