‘तू मला शोभत नाहीस!’ म्हणत लग्न मोडले, पिस्तुलचा धाक दाखवल्याचा आरोप; PSIवर 14 लाखांच्या वादाचा बॉम्ब! बीड हादरलं

बीड : लग्नाचे मांडव सजले होते, साखरपुड्याची लगबग झाली होती आणि दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते… पण अवघ्या 11 दिवसांवर आलेलं लग्न अचानक मोडल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातही नवरदेवच पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले आहे.

बीडमध्ये कार्यरत असलेले PSI पवन निंबाळकर यांचा विवाह ठरलेला होता. सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच अचानक त्यांनी “तू मला शोभत नाहीस” असे म्हणत लग्नाला नकार दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा धक्का बसला.
मात्र प्रकरण इथेच थांबले नाही. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, निंबाळकर यांनी केवळ लग्न नाकारले नाही तर सरकारी पिस्तुलचा धाक दाखवत धमकावलेही. या गंभीर आरोपामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून गावात आणि पोलिस विभागातही चर्चेला उधाण आले आहे.

मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, साखरपुड्यापासून ते लग्नाच्या खरेदीपर्यंत सुमारे 14 ते साडे14 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. भांडी, फर्निचर, कपडे आणि इतर लग्नसामग्री आधीच खरेदी करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी लग्न मोडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारानंतर पीडित कुटुंबाने चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून PSI पवन निंबाळकर यांच्याविरुद्ध फसवणूक आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूनेही संबंधित अधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
“आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि झालेला संपूर्ण खर्च परत मिळावा,” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.