समरजित घाडगेंनी ‘तुतारी’ चा निर्णय घेतला , हर्षवर्धन पाटील यांनी लवकर निर्णय घ्यावा ,इंदापूरला पाटील समर्थकांचा दबाव ….!!

इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूरात झालेल्या जनसन्मान यात्रेत गेल्या पाच वर्षामध्ये दत्तात्रय भरणे यांनी 5425 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य इंदापूर तालुक्यात मंजूर करून आणले असल्याचा दावा अजित पवार यांनी करून दत्तात्रय भरणे यांना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले आहे. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरुन हर्षवर्धन पाटील यांच्या गटात चलबीचल वाढली असून हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूरला समरजित घाडगे यांनी निर्णय घेतला. तुम्ही पण निर्णय घ्या असा मतप्रवाह हर्षवर्धन समर्थकांत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना समर्थकांनी निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदापूरची चर्चा राज्यात सुरू आहे. स्वतः हा हर्षवर्धन पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तिसरा उमेदवार उभा राहणार हे निश्चित आहे अशा परिस्थितीत मतांचे विभाजन नको म्हणून हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का याची देखील चर्चा सुरू झाली असून दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जुना प्रयोग हातात घेण्याचे ठरवले आहे त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यावर दबाव आणत इंदापूर तालुका विकास आघाडीला नव्याने जन्म देण्याचे प्रयोजन सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात हसन मुश्रीफ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याचे निश्चित होताच भाजपचे नेते समरजीत सिंह घाटगे यांनी एका घावात दोन तुकडे केले आणि वेळेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात परतण्याचा निर्णय घेतला, त्यांनी जे धाडस दाखवले, तेच हर्षवर्धन पाटील आणि दाखवावे अशीच चर्चा आता हर्षवर्धन पाटलांचे समर्थकही करू लागले आहेत. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक करत सुप्रिया सुळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील तुतारी कडे येऊ शकतात असे संकेत दिले आहेत.
