एसटीतून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय, ‘ते’ दोघे तात्काळ निलंबित

भंडारा : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित बसचालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरपासून ही कारवाई लागू करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?


१४ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून दोन अल्पवयीन मुली प्रवास करत होत्या. मात्र, रात्रीच्या वेळी त्यांना रोहा येथे अंधारात बसमधून उतरविण्यात आले. या घटनेची बातमी स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर एसटी प्रशासनात खळबळ उडाली.

या प्रकरणाची तातडीने प्राथमिक चौकशी करण्यात आली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांच्या चौकशीत संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले असून पुढील शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे.

प्रताप सरनाईकांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा
या घटनेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशा स्पष्ट सूचना एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने आवश्यक परिपत्रकीय सूचना जारी कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पुन्हा अशी घटना घडल्यास थेट बडतर्फी!
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही एसटीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
सध्या संबंधित चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. मात्र, यापुढे असा प्रकार घडल्यास संबंधितांना थेट सेवेतून बडतर्फ केले जाईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
