मित्राच्या घरातून बाहेर पडला अन् अचानक गायब! चार महिन्यांपासून तन्मयचा पत्ता नाही; मोबाईलचं शेवटचं लोकेशन सोलापूरकडे, रॅगिंगच्या आरोपांनी खळबळ


पुणे : वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात आलेला तन्मय वांगे हा विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. १८ जुलै रोजी खराडीतील मित्राच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो कुठे गेला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. मुलगा ग्रामीण भागातून आल्यामुळे त्याला महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांकडून त्रास आणि भेदभाव सहन करावा लागत होता, असा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. तन्मयच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन उरुळी कांचन परिसरात मिळालं असून, तो सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

कोल्हापूरचा रहिवासी असलेला तन्मय पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. १८ जुलै रोजी खराडी येथील मित्राच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो बेपत्ता झाला. चार महिने उलटूनही मुलाची कोणतीही माहिती मिळत नसल्याने वडील अजय वांगे यांची चिंता वाढली आहे. मुलाच्या प्रतीक्षेत कुटुंबीयांचे सण-उत्सवही काळजीत गेले.

तन्मय ग्रामीण भागातून आल्याने शहरातील विद्यार्थ्यांकडून त्याच्याशी भेदभाव केला जात होता, असं त्याच्या मित्रांनी सांगितल्याचा दावा अजय वांगे यांनी केला. काही विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तन्मयचे वसतिगृहातील सहकारी, वर्गमित्र, आरोप असलेले विद्यार्थी आणि काही प्राध्यापकांचे जबाब नोंदवले. मात्र, चौकशीत छळवणुकीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितलं.

दरम्यान, खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मयचा शोध घेण्यासाठी त्याच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. समाजमाध्यमांवरील खात्यांचं विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी आणि गोवा, नाशिक व बीड येथे शोधमोहीम राबवण्यात आली. मोबाईलचं शेवटचं लोकेशन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालं. तो सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची माहितीही मिळाली; मात्र दौंड रेल्वे स्थानकावरील कॅमेरे बंद असल्याने पुढील तपासासाठी महत्त्वाचा दुवा मिळू शकला नाही. तन्मयची ओळख आणि संपर्काची माहिती राष्ट्रीय माहिती यंत्रणेवर अपलोड करण्यात आली आहे.

दुसरीकडे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी पोलिसांना आवश्यक ती सर्व माहिती दिली जात असल्याचं स्पष्ट केलं. महाविद्यालयात रॅगिंग किंवा छळवणुकीला थारा नसून तक्रारींच्या निवारणासाठी सक्षम यंत्रणा असल्याचंही त्यांनी सांगितलं. चार महिन्यांनंतरही तन्मयचा शोध लागलेला नसल्याने वांगे कुटुंबीयांची प्रतीक्षा कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!