प्रदिप कंद यांची संधी हुकल्याने हवेलीत नाराजीचा सूर! हवेलीकरांना पुन्हा पहावी लागणार संधीची वाट..!!

जयदिप जाधव
उरुळीकांचन : शिरुर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक एक सक्षम पर्याय म्हणून स्वतः हा अजित पवार यांनी चाचपणी केलेल्या जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप कंद यांचे नाव पाठिमागे पडल्याने या बदलत्या घडामोंडींनी हवेली तालुक्यात नाराजी पसरली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेल्या प्रदीप कंद यांच्या उमेदवारीला अजित पवार यांनीच चर्चेत आणल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रदिप कंद यांच्या उमेदवारीचे सुरू असलेले खलबत्ते थांबल्याने तालुक्याची संधी हुकली म्हणून नाराजी पसरली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी खुद्द अजित पवार यांनी चाचपणी केली होती. त्यानुसार त्यांना उमेदवारीसाठी अजित पवार यांनी भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना प्रदिप कंद यांची पक्ष फेरबदल करुन मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रदिप कंद यांच्या नावाला अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांनी संमती दर्शवली होती. प्रदिप कंद यांना हवेलीतून संधी मिळणार म्हणून तालुक्यातील जनतेचे त्यांच्या उमेदवारीसाठी आशा पल्लवीत होऊन त्यांच्या उमेदवारीकडे डोळे लागले होते. हवेली तालुक्यात एकमुखी नेतृत्वाची उणीव प्रदिप कंद यांच्या रुपाने भरुन निघेल अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेला लागली होती.
तालुक्याला विधानसभा व लोकसभेत प्रतिनिधित्व मिळत नसल्याने प्रदिप कंद यांच्या रुपाने तालुक्याला संधी मिळू शकेल म्हणून तालुक्याचा नजरा शिरुर लोकसभा उमेदवारीकडे लागल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी गळ घातल्याने आढळराव पाटील यांचे नाव निश्चित झाल्याने प्रदिप कंद यांची संधी हुकल्याने तालुक्यात नाराजी पसरली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना घड्याळाचे काम करणे रुचेना!
पुणे जिल्ह्यात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हात करुन लढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना महायुतीत घड्याळाचे काम करणे रुचणार नसल्याची नकारखंटा कार्यकर्ते बोलत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिरुर-हवेली मतदारसंघात युती होऊन भाजपला शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी यांनी साथ न दिल्याचे खंत आहे. तसेच राष्ट्रवादीने भाजपला पाणी पाजल्याने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना घड्याळाचे काम कसे करायचे म्हणून रस वाटेनासे झाल्याचे कार्यकर्ते खुलेआम बोलत आहे.