Politics : हवेली तालुक्याचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का?, शिरुर -हवेलीच्या मतदारसंघाच्या पुर्नरचनेत शेवटची संधी तालुका साधणार…!

जयदिप जाधव

Politics उरुळीकांचन : विधानसभेच्या २०२९ च्या निवडणूकीला मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. त्यामुळे आगामी २०२४ ची विधानसभा निवडणुक ही २००९ च्या पुर्नरचित केलेल्या मतदारसंघांसाठी शेवटची निवडणूक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्याचा विचार करता एक किंवा अनेक तालुके मिळून झालेल्या मतदारसंघासाठी ही निवडणूक आता शेवटची ठरणार आहे. Politics
त्यामुळे शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता शिरुरला जोडलेल्या हवेली तालुक्याला या मतदारसंघात शेवटची प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार का ? म्हणून हवेली तालुक्यात अस्मितेचा मुद्दा उपस्थित होत असून शिरुर – हवेलीत गत तीन निवडणूकांत एकदाही प्रतिनिधित्वाची संधी न मिळालेल्या हवेली तालुक्यासाठी अस्मिता जागी होणार का ? या मुद्दाला तालुका साथ देणार का ? म्हणून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

राज्य विधानसभेच्या निवडणूकीला दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने इच्छुक आता तयारीसाठी मैदानात उतरले आहेत. राज्य विधानसभा मतदारसंघाचे २०२९ ला पुर्नरचित होणार असल्याने आगामी निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरणार आहे. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यात विभागलेल्या मतदारसंघासाठी निवडणूक शेवटची ठरणार आहे.
हवेली तालुका हा एकसंध नसल्याने तालुक्याला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही वारंवार हिरावली जात आहे. २००९ पर्यंत पिंपरी चिंचवड शहराचा भाग व ग्रामीण भाग मिळून हवेली मतदारसंघ अस्तित्वात होता. मात्र या मतदारसंघाचे नेतृत्व शहरी भाग करीत होता. तीच परिस्थिती पुरंदर -हवेली मतदारसंघाची असताना पुरंदरचे नेतृत्व स्विकारावे लागत होते. त्यानंतर शिरुर- हवेली, पुरंदर-हवेली व खडकवासला मतदारसंघात तालुक्याला प्रतिनिधित्व मिळत नसल्याची स्थिती आहे. मात्र शिरुर -हवेलीत तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावं अशी रास्त मागणी आता अस्मितेच्या रुपाने पुढे येऊ लागली आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणूकीत पुर्नरचित झालेल्या शिरुर-हवेली मतदारसंघात शिरुर तालुक्यातील ६० गावांचा सामावेश तर हवेली तालुक्यातील ४०गावांचा सामावेश झाला आहे. मात्र या मतदारसंघात ३ वेळा शिरुरला लोकप्रतिनिधी मिळाले आहे. हवेलीला मात्र संधी मिळू न शकल्याने या मतदारसंघात शेवटच्या निवडणूकीला संधी मिळणार का म्हणून तालुक्याच्या अस्मितेच्या मुद्दात हात घातला जात आहे. हवेलीच्या अस्मितेचा मुद्दाला कारणही असल्याने तालुक्यात आता ‘जय हवेली’चा नारा घुमू लागला आहे. पण आजावरच अनुभव पाहता तालुका हवेलीसाठी एकमुखी होणार का चर्चा रंगू लागली आहे.
हवेली तालुक्याला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळत नसल्याने तालुक्याचा गुणात्मक विकास, पायाभूत सुविधा तसेच भेडसविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनीची कमतरता कायम जाणवली आहे. शिल्लक मिळेल ते तालुक्याला या युक्तीप्रमाणे तालुक्याला कायम स्वामिमान दुखावल्याचा इतिहास आहे. अशावेळी कायम परक्या नेतृत्वावर तालुक्याला विसंबून रहावे लागत आहे. अशावेळी तालुक्याने साखर कारखाना व बाजार समिती या संस्था प्रशासकीय जोखडात मुक्त करुन सहकारात पुन्हा उभ्या करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. अशीच आवस्था शासकीय व्यवस्था, सिंचन, दळणवळण, पोलिस प्रशासनातील त्रुटींना नागरीकांना नाहक त्रासात झालाय पण समस्या सुटत नसल्याची स्थिती आहे.
त्यामुळे हवेली तालुक्यात आगामी निवडणूक ही तालुक्याची अस्मिता एकवटली जाणार का म्हणून बेरीज वजाबाकी सुरू झाली आहे. तालुक्यात पक्षीय माध्यमातून एका नेतृत्वाच्या पाठिमागे उभे राहणे स्विकारणार काय ?अशाही चर्चांचे कांगोरे उडू लागले आहेत. हवेली तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी माध्यमातून भाजपकडून जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप कंद व शिवसेना ( उध्दव ठाकरे) गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके हे प्रमुख इच्छुक उमेदवार झाले आहेत.
या इच्छुकांत युतीकडून प्रदिप कंद अधिकची संधी राहणार आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सक्षमपणे भूषविले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा अधिक आहेत. त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणुक वेळोवेळीदाखविल्याने तालुका आता नेतृत्वाची अपेक्षा करु लागला असून या दोघा नेतृत्वामुळे हवेलीची अनेक वर्षांच्या आमदारकीची दिर्घ तपास्या पूर्ण फळास येणार का म्हणून चर्चेचे बाण सुटत आहे.