मुळशी तालुक्याची ओळख मुळशी पॅटर्न नव्हे तर कुस्तीवर प्रेम असलेले, पर्यटने नटलेला तालुका आहे .. पुणे ग्रामीण मधून सोलापूर ग्रामीण मध्ये बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल…!
पुणे : माझी प्रशासकीय बदली पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण अशी झालेली आहे. नोव्हेंबर २०२० ते जुलै २०२३ या दरम्यान मुळशी तालुक्यात पौड पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कामकाज करण्याची संधी मला मिळाली.
सदर कालावधीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सहकारी अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे चांगल्या प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्याप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी व पत्रकार बंधू यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
मुळशी तालुक्यामध्ये येण्यापूर्वी मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे मुळशी तालुक्यातील खून आणि गँगवार याचे चित्रपटामध्ये उभे केलेले चिञ रूजू होताना डोळ्यापुढे आले. माञ प्रत्यक्ष मुळशी तालुक्यात काम करण्यास सुरूवात केल्यानंतर येथे वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या मुळशी तालुक्यातील नागरिक मधाळ आंब्या सारखीच गोड आहेत.
मुळशी तालुक्याची खरी ओळख ही सांप्रदायिक, कुस्तीवर प्रेम असलेले, पर्यटने नटलेला व शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेला तालुका असल्याचे काम करत असताना प्रकर्षाने जाणवले. बोटावर मोजण्या ऐवढी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सोडले तर तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना सारख्या महामारीपासून सर्व गोष्टीत मदतीला धावणारे नागरिक दिसून आले.
पौड पोलीस स्टेशन येथे काम करत असताना पौड येथील विठ्ठलवाडी येथे असलेले श्री. स्वामी समर्थ मठ येथे जाण्याचा योग आला. मी स्वतः श्री. स्वामी सेवेकरी असून, पौड येथील श्री. स्वामी समर्थ मठाला उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी केलेल्या आव्हानाला सर्व क्षेत्रातील नागरिकांनी भरभरून साथ दिली.
स्वामींच्या कृपेने पौड पोलिस स्टेशन येथून माझी बदली योगायोगाने स्वामींच्या सोलापूर जिल्ह्यातच झालेली आहे. मुळशी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकानी पौड येथील मठामध्ये लक्ष घालावे अशी अपेक्षा उराशी बाळगतो. येथून जात असताना मुळशी तालुक्यातील आठवणी कायम उशाशी राहतील.