पोलिस कर्मचाऱ्याला सेवेवर असताना भरधाव वाहनाची जोरदार धडक; उरुळी कांचनमध्ये सहाय्यक फौजदार गणेश रतन दाभाडे यांचा अपघाती मृत्यू

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे (वय 49 मूळ -सिंदखेडा,धुळे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना रस्ता ओलंडत असताना श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश दाभाडे हे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


दरम्यान, सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे हे मूळचे सिंदखेड, धुळे येथील रहिवासी असून ते २००१ साली पोलिस दलात भरती झाले असून ते २००१ पासून पुणे ग्रामीण पोलिस कार्यरत आहे. पौंड, वेल्हे, जेजुरी , सासवड पोलिस ठाण्यात सेवा बजावून ते उरुळीकांचन पोलिस सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधन बातमी समजताच उरुळीकांचन पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांना शोककळा पसरली आहे. त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून शासकीय इतमातात त्यांच्यावर मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. त्यामुळे बेफाम वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.